top of page
himahajanvijay

माझा वैश्यवाणी समाजात येईपर्यंतचा प्रवास

Updated: Sep 1, 2020

मी सौ दिपा राजेंद्रकुमार गाड , राहण्याचे ठिकाण गोरेगाव. 

आज मी माझा वैश्यवाणी समाजात येईपर्यंतचा प्रवास वर्णन करणार आहे.

खरंतर मला वैश्यवाणी वधुवर समाजात काम करावेसे का वाटले ते सांगते.

माझी माहेरची परिस्थिती तशी खूप चांगली होती, वडील मुलुंडच्या तहसीलदार ऑफिसमध्ये (गव्हर्नमेंट) नोकरी करत होते. खाऊन पिऊन खूप सुखी असे कुटुंब... वडिलांनी केलेली प्रामाणिक नोकरी.... हा आमच्यासाठी आदर्श होता म्हणजेच कधी कोणाकडून कुठल्याही प्रकारची लाच घेतली नाही त्यावेळेला जमीन मोजणे वगैरे कामात लोक लाच देऊन काम करून घ्यायला बघत पण ते प्रामाणिकपणे काम करत होते. तेव्हा आम्हाला लहानपणी सांगायचे माझ्याबरोबरच्या सहकाऱ्यांनी लाच घेऊन बंगला, गाडी घेतली आणि मी असाच राहीलो, पण मी सुखी आणि आनंदात आहे. त्यावेळेला त्यांच्याकडून आम्हाला हीच शिकवण मिळाली की कुठलंही काम प्रामाणिकपणे करा. लाच घेऊन कुठलंही काम करू नका. आणि हीच शिकवण आज माझ्या बाबांच्या मागे माझा लहान भाऊ आचरणात आणत आहे. हे बघून खूप छान वाटतं. 


एके दिवशी माझे बाबा कामावरून आले थोडं अस्वस्थ वाटू लागलं म्हणून झोपले पण मग बोलताना त्यांचे तोंड वाकडे होऊ लागले . तेव्हा आम्हाला हे कळलेच नाही की माझ्या बाबांना प्यारालिसीसचा अटॅक आला ते कारण हा आजार कधी तेव्हा कोणाला झालेला पाहिलाच नव्हता आणि मग आमचे दिवसच फिरले, होता नव्हता तेवढा पैसा त्यांच्या आजारपणात गेला. एवढा खर्च करूनही शेवटी माझे बाबा एप्रिल १९९० मध्ये हे जग सोडून गेले. आम्ही पोरके झालो. त्यावेळी अगोदरच माझ्या मोठ्या बहिणीचे लग्न झालेले होते. नंतर आम्ही २ भाऊ, मी व आई असा परिवार.... बाबा गेल्यानंतर त्यांच्या ऑफिसच्या सहकाऱ्यांनी सर्व पैसे मिळवण्यासाठी खूप मदत केली त्यांचे प्रॉव्हिडेंट फंड, आणि कसले कसले पैसे होते. त्यांच्यानंतर घरातील एकाला त्यांच्या जागी कामाला लावण्यासाठीही सहकाऱ्यांनी मदत केली. मोठा भाऊ नुकताच भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीत कामाला लागला होता. म्हणून मग मला त्यांच्याजागी कामाला लावण्यासाठी प्रयत्न सुरू झाले कारण लहान भावाला १८ वर्षे पूर्ण झाली नव्हती.  पण ते काम होता होता २ वर्ष अशीच निघून गेली आणि मग बाबांच्या ऑफिस मधल्या मित्रांनी मोठया भावाला सांगितले की बहिणीच्या ऐवजी लहान भावाला कामाला राहू दे कारण बहीण कदाचित लग्न झाल्यावर नोकरी सोडली तर फुकट जाईल. आणि मग लहान भावाला कामाला लावायचे ठरले त्याचे १८ वर्षे वयही तोपर्यंत चालू झाले होते. अश्या तऱ्हेने लहान भाऊ कामाला लागला. मोठ्या भावाचे लग्न झाले. माझ्या लग्नाची बोलणी चालू झाली. बरेचसे नातेवाईक स्थळ सांगत होती , बघण्याचे कार्यक्रम होत होते. पण कधी मला पसंत पडत नव्हते तर कधी माझी नोकरी कमी पगाराची असल्यामुळे मी पसंत पडत नव्हते. मग दादरच्या वैश्यवाणी समाजात नाव नोंदणी केली गेली. हे करता करता ८-९ वर्षे गेली. मग मीच लहान भावाला म्हटले मी काही आता लग्न करेन असे वाटत नाही तर तू लग्न करून घे. सर्वप्रथम आई यासाठी तयार होईना, आणि अचानक लहान भावासाठी एक स्थळ कोणीतरी सुचवले आणि मी पुढाकार घेऊन त्याचे लग्न ठरविले. जून १९९९ मध्ये त्याचे लग्न पार पडले.  त्यादरम्यान दादरच्या वैश्यवाणी समाजातर्फे वधुवर मेळावा आयोजित केला होता तेव्हा त्यात मी सहभागी झाले होते. त्यावेळेला प्रत्येक वधु वरांनी आपापली माहिती पुढे स्टेजवर जाऊन सांगायची होती. हा कार्यक्रम तेव्हा मला खुप आवडला होता, म्हणजे मुलगी बघण्यासाठी ना मुलीच्या घरी जावं लागतं होतं, समोरासमोर पसंती करायची होती, पसंती झाल्यावर बोलणी करणे वगैरे.. हा प्रकार त्यावेळेला मला खूपच आवडला होता. पण असं कधी वाटलं नव्हतं की मीही एक न एक दिवस याच कामात सहभागी होईन. 

नंतर याच मंडळातून लहान भावाने स्थळ आणली आणि माझ्या मामाने संपर्क करून माझे लग्न जमवले. तेव्हापासून या वधुवर मंडळाबद्दल थोडी आपुलकी निर्माण झाली. आणि २५ डिसेंबर १९९९ मध्ये माझे लग्न झाले नंतर मला मुलगी झाली आम्ही त्यावेळेला विरारला राहायला होतो. गोरेगावचा प्लॉट मोठा होता तो develop झाला आणि इमारत तयार झाली. त्याअगोदर गोरेगाव मधेच एक वर्ष भाड्याने राहिलो. तेव्हाच भाच्याचे लग्न जमविण्यासाठी आपल्या गोरेगाव वैश्यवाणी वधुवर समाजात भाच्याचे नाव नोंदणी करण्याकरता ऑफिस मध्ये गेलो तेव्हा श्री नारकर काकांशी ओळख झाली. मग समाजाच्या वधुवर मेळाव्याला हजर राहिलो तेव्हा परत माझ्या मनातील सुप्त इच्छा स्वस्थ बसू देईना. त्याचवेळेला म्हणजे २००९ साली नारकर काकांनी मला काम करण्याविषयी विचारले आणि मी आनंदाने तयार झाली हे काम करायला. मग गोरेगाव पांडुरंगवाडीत असलेले वैश्यवाणी समाज गोरेगाव ऑफिस हे श्री महेश पोंगुर्लेकर यांच्या ऑफिसमध्येे शिफ्ट झाले. मग कधी कधी त्या ऑफिसमध्ये जाऊ लागली, मीटिंग अटेंड करू लागली. असे करता करता वधुवर मेळाव्यासाठी काम करू लागली. हे काम करता करता आपल्या महिला सदस्यांची ओळख झाली, सर्वजण एकजुटीने काम करू लागलो. 


त्यावेळी वधुवर मेळावा झाला आणि एका मिटींगमध्ये पाटणे बंधूनी वधु-वर यांचा व्हाट्सअप्प ग्रुप काढायचा ठरवला त्या ग्रुपमध्ये श्री सुनील ताम्हणेकर यांनी मला ऍड केले. मग त्या ग्रुपवर एकेक काम चालू झाले. वधु वरांची माहिती आम्ही दिलेल्या फॉरमॅट मध्ये व फोटो त्यांच्याकडूनच मागवून (एव्हढ्याचसाठी की वधुवरांच्या पालकांनी दिलेली माहिती व फोटो व्हाट्सअप्प ग्रुपवर टाकण्यासाठी परवानगी आहे असे गृहीत धरून) ग्रुपवर टाकत गेली. खरंतर श्री नारकर काकांची त्यासाठी नापसंती होती त्यांचे म्हणणे होते की मुलींच्या फोटोचा कोणीतरी गैरवापर करू शकतो. त्यांचेही म्हणणे बरोबर होते. मग त्यांना आम्ही पटवून दिले की वधु वर किंवा त्यांचे पालक हे स्वतःहून जेव्हा माहिती फोटो ग्रुपवर पोस्ट करायला देतील तेव्हा त्यांच्या संमतीनेच आम्ही ते ग्रुपवर पोस्ट करू. तेव्हा बऱ्याच मुलींच्या पालकांनी माहिती फोटो दिली नव्हती, पण जसजसे त्यांना इतरांकडून ह्या ग्रुपबद्दल कळू लागले तेव्हा ते स्वतःच मुलींची माहिती फोटो देऊ लागले. तेव्हा आम्हाला बहुतेकांचे फोन ही आले तुम्ही हे काम खूप छान प्रकारे करत आहात म्हणून. आणि त्यांच्या त्या प्रतिसादाने आम्हा सर्वांना खूप काम करण्यासाठी हुरूप येत होता. या व्हाट्सअप्प ग्रुपवर मी ४-५ वर्षे सतत काम करत आहे त्यामुळे बऱ्याच जणांच्या ओळखी झाल्या. ज्यांना आमच्या या ग्रुपबद्दल उपयोग झाला ते इतर जणांना सांगत होते आणि मग असे करता करता बरेच जणांचे मला फोन येऊ लागले. आम्हाला ही तुमच्या संस्थेत नावनोंदणी करायची आहे. आणि आमची माहिती व फोटो तुमच्या वधुवर ग्रुपमध्ये ऍड करा.  कधी कधी असेही फोन येत, मॅडम अमुक व्यक्तीकडून आम्हाला कळले की तुम्ही लग्न जमवता म्हणून, तेव्हा त्यांना मी सांगायची मी वैयक्तीक हे काम करत नाही तर वैश्यवाणी समाज गोरेगाव तर्फे मी हे काम करते त्यामुळे अगोदर तुम्हाला नावनोंदणी करावी लागेल तेव्हाच मी तुमच्या मुला/मुलींच्या योग्यतेची स्थळ पाठवू शकते. कधी असेही फोन येत, मॅडम माझ्या मूलगा/मुलगीसाठी स्थळ सांगा, लग्न जमल्यास आम्ही तुम्हाला तुमची फी देऊ. तेव्हा मी त्यांना हेच सांगत आली. मला काही न देता आमच्या संस्थेला देणगी द्या. मी ही समाजसेवा म्हणून काम करत आहे. मला या कामातून खूप समाधान मिळू लागले. तर आज ११ वर्ष होत आली माझ्या या कामाला . आजपर्यंतचा माझा हा वैश्यवाणी समाजात वावरण्याचा प्रवास असा सुखदायी झाला आणि अजून पुढे राहील अशी आशा व्यक्त करते. 

धन्यवाद!


57 views0 comments

Comments


bottom of page